Shri Rajan Vichare's website. Shivsena - BJP candidate from Thane-148 constituency.
मुखपृष्ठ  |  मनोगत  | पुरस्कार  |  झालेले प्रकल्प  |  महत्त्वाकांक्षी प्रकल्प  |  आव्हाल  |  बातम्या  |  लोकसभेतील कामकाज  |  प्रेरणास्थान  |  संघ्र  |  संपर्क
सॅटीस
ठाणे शहरातील वाहतुकीला कंटाळलेल्या नागरिकांना दिलासा देणारा सॅटीस...
अधिक वाचा
पाणी पुरवठा योजना
अतिरिक्त 110 द.ल.लि. प्रतिदीन पाणी पुरवठा योजना...
अधिक वाचा
मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र
बाळकुम येथे मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करण्यात आले.
अधिक वाचा
 
महानगर पाइप गॅस
ठाणे शहरात महानगर पाइप गॅसचे कनेक्शन
अधिक वाचा
मुलभूत सुविधा
एकात्मिक रस्ते विकास प्रकल्प
कोणत्याही शहराचा सर्वांगीण विकास त्या शहरामध्ये पायाभूत सुविधांचे जाळे कशापद्धतीने विखुरले आहे यावर अवलंबून असतो. विकासाचे हे सूत्र लक्षात घेऊन आम्ही महापालिकेच्या माध्यमातून शहरामध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या कामाला प्राधान्य दिले. विशेषत: शहरामध्ये रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी एकात्मिक रस्ते विकास प्रकल्प राबविण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला.

औद्योगिकदृष्टया प्रगतिपथावर असलेल्या ठाणे शहराचा चेहरा-मोहरा बदलविण्याचा महापालिकेने केलेल्या प्रयत्नांपैकी एक प्रयत्न म्हणजे शहरातील रस्त्यांचा कायापालट करणे. शहरातील वाहतुकीची समस्या आणि रस्त्यांची परिस्थती लक्षात घेऊन आम्ही शहरातील रस्ते सिमेंट काँक्रिटचे बांधण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतला. केवळ निर्णयच घेतला नाही तर त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्यादृष्टीनेही महत्वाची पावले उचलली.

शहराचा पायाभूत विकास करण्याच्या दिशेने महत्वाच्या ठरणाऱ्या या निर्णयामुळे आजमितीस पालिकेने शहरामध्ये 24.5 कि.मी. लांबीचे सिमेंट क्राँकिटचे रस्ते बनविले आहेत. उर्वरित काम येत्या एक दीड वर्षांत पूर्ण होईल. कळवा मुंब्रा रस्त्याचं डांबरीकरण करण्याच्या कामालाही प्राधान्य देण्यात आलं आहे. त्याशिवाय शहरातील रस्त्यांचं नूतनीकरण आणि रूंदीकरण मोहीम हाती घेऊन रस्त्यांचा कायापालट करण्याच्या कामाला आम्ही प्राधान्य दिले. आज शह्रातील रस्ते एकतर सिमेंट काँक्रिटचे नाहीतर डांबराचे बनविले असल्याचे दिसतील. शहरात सर्व भागामधील रस्ते एकमेकांना जोडून नागरीकांची सोय केलीच पण शहह्रातील रस्ते हे शहराच्या विकासाचे प्रतिबिंब म्हणून शहराच्या वाहतुकीला मोकळी वाट निर्माण करून देण्यात आम्ही यशस्वी झालो.

 
निसर्ग उद्यान
घोडबंदर परिसरातील आणि पर्यायाने ठाणे शहरवासीयांना अत्याधुनिक सोयी-सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही खाजगी सहभागातून घोडबंदर रोड येथे संपूर्ण देशात एकमेव ठरावे असे भव्यदिव्य निसर्ग उद्यान निर्माण केले. मु‌ल्लाबाग येथील 12 एकर राखीव भूखंडावर निर्माण होणारे हे निसर्ग उद्यान ठाणे शहरवासीयांच्यादृष्टीने एक महत्वाची भेट ठरावी अशीच आहे.

निसर्ग उद्यानाच्या पहिल्या टप्प्यात लहान मुले आणि तरूणांसाठी अत्याधुनिक सोयींनीयुक्त ऍ़म्पी थिएटर, ज्येष्ठ नागरीकांना एकत्र येऊन विविध विषयांवर गप्पा मारता याव्यात, छोट्या प्रमाणातील चर्चासत्रे आयोजित करता यावीत यासाठी पॅरागोला ही विशिष्ठ बैठक व्यवस्था, सुमारे 125 जातींच्या औषधी वनस्पतींची लागवड, पर्जन्य जलसंचयन योजना, पक्षी आणि प्राण्यांची आकर्षक चित्रे, प्राणी, पक्षी आणि वनस्पती यांचा अभ्यास करण्याची सोय, आकर्षक कारंजे आणि डोळे दीपवणारी विद्युत रोषणाई आणि लहान मुलांसाठी खेळण्याचा विशेष विभाग, उपहार गृह आदी सोयी सुविधांनी हे निसर्ग उद्यान सुसज्ज आहे.

या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात भुशी धरणाची प्रतिकृती करण्यात येणार असून हे सौंदर्य पाह्ण्यासाठी विशेष प्रेक्षक गॅलरीही उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर बालभवन, नाना-नानी पार्क, गोल्फ कोर्स, सायकल पथ आणि प्रथमोचार केंद्र आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. थोडक्यात ठाणे शहराच्या इतिहासाला चार चाँद लावेल अशीच या उद्यानाची निर्मिती केली आहे. जिथं शहरवासीयांना मनोरंजनाची अनेक दालनं अनुभवता येतील, आनंदी जगण्याचा अनुभव घेता येईल.

 
पर्यायी गणेश विसर्जन
 
शहरातील तलावांमधील प्रदूषण कमी करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी इको फ्रेंडली गणेश विसर्जन अर्थात पर्यायी गणेश विसर्जन व्यवस्था ही संकल्पना राबविण्याचा निश्चय करून ठाणेकरांच्या प्रतिसादामुळे आम्ही ती प्रत्यक्षात उतरविली. पर्यावरणाभिमुख शहराची रचना करण्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरावी यासाठी महापालिका अनेक उपाययोजना करीत असून गेल्या दोन वर्षांपासून शहरामधील तलावांमध्ये होणारे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने पर्यायी विसर्जन व्यवस्था करण्यात येत आहे.

हिंदू संस्कृतीप्रमाणे गणेश मूर्तींचे वाहत्या पाण्यात विसर्जन व्हावे यादृष्टिकोनातून महापालिकेने पारसिक रेती बंदर आणि कोलशेत येथे य्वसर्जन महाघाट तयार केले आहेत. या ठिकाणी छोट्या गणेश मूर्तींबरोबरच 5 फूट आणि त्यापेक्षा मोठ्या आकाराच्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्याची व्यवस्था करण्यात येते. या ठिकाणी आरतिस्थाने आणि निर्माल्य कलश या व्यवस्थेबरोबरच नागरिकांना श्री गणेश विसर्जन सोहळा पाहता यावा यासाठी विशेष व्यवस्था, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, गणेश भक्तांच्या वाह्नांसाठी वाह्न तळ, पाणबुडी पथक, अग्निशमन दल, प्रखर विद्युत व्यवस्था, वैद्यकीय पथक आणि प्रसाधन गृह अशी यंत्रणा सज्ज ठेवण्यात येते.

श्री गणेश मूर्तींच्या विसर्जनामुळे शहरातील तलावांचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने वागळे इस्टेट परिसरातील रायलादेवी, उपवन, आंबेघोसाळे, मासुंदा तलाव येथे कृत्रिम तलाव तयार करण्यात येतात. या कृत्रिम तलावाच्या ठिकाणी आरतिस्थाने, निर्माल्य कलश, वैद्यकीय पथक, अग्निशमन दल, प्रखर विद्युत व्यवस्था, ध्वनिक्षेपण यंत्रणा आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. त्याचप्रमाणे शहरात ठिकठिकाणी श्रीमूर्ती स्वीकार केंद्रे निर्माण करण्यात येतात. या केंद्रांवर प्राप्त होणाह्रया सर्व गणेश मूर्तींचे महापालिकेमार्फत विधिवत विसर्जन करण्याची व्यवस्था करण्यात येते.

 
प्रदूषणमुक्त परिवहन सेवा
ठाणे शहराच्या विकासामध्ये ठाणे परिवहन सेवेचा महत्वाचा वाटा आहे. नागरिकांच्या प्रवासासाठी सदैव कटिबद्ध असलेल्या महापालिकेच्या परिवहन सेवेच्या माध्यमातून जास्तीत जास्त चांगली सेवा देण्याचा आमचा नेह्मीच प्रयत्न राहिला आहे. ही सेवा देतानाच निसर्गाचा समतोल साधून ठाणे शहराला प्रदूषणमुक्त करण्याच्या उद्देशाने आणि या शहराच्या पर्यावरणाभिमुख विकासाला प्रेरक ठरणारा महत्वपूर्ण निर्णय आम्ही घेतला तो म्हणजे सी.एन.जी.वर चालणाऱ्या बसेसची खरेदी करणे. यामागे पर्यावरणाचा ध्यास हा मुख्य उद्देश होताच पण त्याबरोबर इंधन बचत हा दुहेरी उद्देश आम्ही साध्य केला.
यासाठी महापालिकेने परिवहन सेवेसाठी सी.एन.जी. बसेस खरेदी केल्या. सी.एन.जीवर चालणाऱ्या नवीन बसेसची खेरदी करण्याबरोबरच परिवहन सेवेतील बसेसना सी.एन.जी. कीटस् बसविण्याचा मह्त्त्वपूर्ण निर्णयही आम्ही घेतला. बसेस खरेदी केल्या. सी.एन.जीवर चालणाऱ्या नवीन बसेसची खेरदी करण्याबरोबरच परिवहन सेवेतील बसेसना सी.एन.जी. कीटस् बसविण्याचा मह्त्त्वपूर्ण निर्णयही आम्ही घेतला.

महापालिकेने खरेदी केलेल्या नवीन बसेसपैकी पंचवीस बसेस या सी.एन.जी.वर चालणाऱ्या बसेस आहेत. शहरवासीयांचा प्रवास अधिक सुखकर आणि जलद व्हावा यासाठी महापालिकेने नवीन बसेस खरेदी करण्याबरोबरच 50 बसेस कंत्राटी पध्दतीने घेण्याचा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी केली.

खऱ्या अथाने महापालिकेची परिवहन सेवा ही या शहराच्या विकासाची धमनी बनविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून या निमित्ताने शहरवासीयांना जास्तीतजास्त चांगली वाहतूक सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. याचाच एक भाग म्हणून परिवहन सेवेच्या ताफ्यामध्ये अजून 110 नव्या सी.एन.जी.बसेस दाखल होणार आहेत. यामधील 87 बसेस 17 कोटी रूपयांची रक्कम उभारून कर्जरूपाने खरेदी करण्यात येणार आहेत तर 25 बसेस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरातील वाहतूक सेवा नित्य आणि नियमित होऊन शहरवासीयांचा प्रवास सुखकर होण्यास मदत होईल. याच्याही पुढे जाऊन लंडन पॅटर्नच्या धर्तीवर ठाणे ते मुलुंड अशी विशेष बससेवा स्वतंत्र मार्गावरून सुरू करण्यात आली असून यामुळे केवळ सहा रूपयांत आणि 15 मिनिटात लोकांना ठाणे ते मुलुंड असा प्रवास करता येणे शक्य झाले आहे. राजकारण बाजूला ठेवून जनतेला जास्तीत जास्त नागरी सुविधा देण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील असून येत्या काही वर्षांमध्ये परिवहन सेवा कात टाकून अजून नव्या जोमाने शहरवासीयांच्या सेवेत रूजू होईल यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. भविष्यात ठाणे महानगरपालिकेची परिवहन सेवा एक उत्कृष्ट सेवा देणारी होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

 
ठाण्याची नवी ओळख 'सोलर सिटी'
 
आधुनिक उपक्रम राबवून ठाणे शहराचा लौकिक वाढविणा-या महापालिकेचा ऊर्जा संवर्धन व सौर ऊर्जेचा वापर या उपक्रमांचा राष्ट्रीय पातळीवर गौरव झाला आहे. या गौरवाची दखल घेऊन केंद्र शासनाच्या अपारंपारिक ऊर्जा मंत्रालयाच्या उपसमितीने नियोजन आयोगास देशामध्ये विविध शहरांची ओळख "सोलर सिटी" म्हणून करावी अशी शिफारस केली आहे. या यादीमध्ये ठाणे शहराचा प्रामुख्याने समावेश आहे. ठाणे शहराची ओळख पूर्वी लेक सिटी म्हणून होती, आता 'लेक सिटी' बरोबरच 'सोलर सिटी' म्हणून ठाणे शहर ओळखले जाणार आहे.
पर्याप्त ऊर्जेचा योग्य वापर व सौर ऊर्जेचा जास्तीतजास्त वापर पालिका क्षेत्रात होण्याच्या दृष्टिकोनातून पालिकेने महत्वपूर्ण पावले उचलून आपल्या मंजूर विकास नियंत्रण नियमावलीमध्ये सुधारणा करून निवासी इमारती वगळता इतर सर्व इमारतींवर सौर ऊर्जेवर आधारित पाणी गरम करण्याचे प्रकल्प उभारण्याचे बंधनकारक करण्याचा निर्णय आम्ही घेतला.
अस्तित्वातील निवासी वापराच्या इमारतीवर सौर ऊर्जेवर आधारित गरम पाण्याची यंत्रणा बसविल्यास ही यंत्रणा सुस्थितीत असेपर्यंत वाषिर्क मालमत्ता करामध्ये 10% सूट देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे शहरातील नागरिकांनी स्वागत करून आतापर्यंत 6520 निवासस्थाने व 20 वाणिज्य संकुलांच्या ठिकाणी ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे वाषिर्क अंदाजे 12 मिलियन युनिटची वीज बचत झाली. महापालिकेने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, सौ.मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण केंद्र, महापौर निवासस्थान व महापालिका आयुक्त यांचे निवासस्थानी ही यंत्रणा कार्यान्वित केली असून यामुळे प्रतिदिन 23500 लिटर्स सौर ऊर्जेवर आधारित गरम पाणी प्राप्त होत आहे. यामुळे वाषिर्क 10.25 लक्ष रूपयांची बचत होण्यास मदत झाली. महापालिकेने 20 टन क्षमतेचा ओला कचरा वापरून मिथेन गॅस तयार करण्याचा प्रकल्प छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या परिसरात कार्यान्वित केला आहे. या प्रकल्पामुळे 1200 घनमिटर मिथेन गॅसची निमिर्ती होत आहे. महापालिकेने केलेल्या या प्रयत्नांची राज्य शासनाने दखल घेऊन सन 2004 सालासाठी राज्यस्तरीय प्रथम पुरुस्कार प्रदान केला आहे. तर केंद्र शासनाकडून शासकीय इमारती या संवर्गात राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन 2005 चे पारितोषिक पालिकेस प्रदान केले आहे. ऊर्जा संवर्धन व सौर ऊर्जेचा वापर यामुळे सोलर सिटी म्हणून देशातील आपला लौकिक महापालिका सार्थ ठरवेल.
 
स्वच्छ आणि सुंदर शहर
 
स्वच्छ आणि सुंदर शहराची संकल्पना घन कचरा व्यवस्थापन कार्यक्रमाशिवाय वास्तवात उतरूच शकत नाही हे आता त्रिकालाबाधित सत्य आहे. कारण ही संकल्पना केवळ शहरात निर्माण झालेला कचरा गोळा करण्याइतपतच मर्यादित नाही. किंवा तो डम्पिग ग्राउंडवर नेऊन टाकण्याइतपतही हा प्रश्न मर्यादित नाही तर गोळा झालेल्या विविध प्रकारच्या कचऱ्याची विभागणी करून त्यातील प्लास्टीक आणि ओल्या कचऱ्यांवर पुन:प्रक्रिया करणे महत्वाचे आहे.

या पार्श्वभूमीवर स्वच्छ आणि सुंदर शहर प्रत्यक्षात अवतरण्यासाठी ठाणे महापालिकेने केलेल्या प्रयत्नांची दखल घ्यायलाच हवी. मुळातच ही योजना राबविताना महापालिके ने या योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या प्रत्येक पैलूंचा अभ्यास केला. पारंपारिक घन कचरा व्यवस्थापन प्रक्रियेला पर्यायी व्यवस्था जी शहरातील कचऱ्याचे प्रमाण कमी करू शकेल. कचऱ्याचे प्रमाण कमी झाले तर गोळा केलेला कचरा वाहून नेण्यासाठी लागणारा वाहतूक खर्चही कमी होईल अशा गोष्टींचा विचार केला. या सर्व प्रक्रियेमध्ये महत्वाचा घटक म्हणून काम करणाऱ्या कचरा वेचकांना केंद्रस्थानी ठेवून त्यांचा सामाजिक आणि आर्थिक विकास करण्याची भूमिका महापालिकेने घेतली आणि ती प्रत्यक्षात राबविलीही. एका बाजूला शहरात गोळा होणारा कचरा कमी कसा होईल, गोळा झालेल्या कचऱ्याचे विघटन करून त्यातील प्लास्टीक कचऱ्यावर पुन:प्रक्रिया करून त्यापासून नवनिर्मिती करणे, ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्माण करणे आदी विषयांवर लक्ष केंद्रीत करतानाच दुसऱ्या बाजूला शहरातील कचरा गोळा करणाऱ्या कचरा वेचक महिला-पुरूष यांना संघटित करून त्यांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे जेणे करून त्यांचा सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचावेल या कामालाही प्राधान्य दिले.

सद्य:स्थित ठाणे शहराची लोकसंख्या ही 16 लाखाच्या आसपास आहे. औद्योगिकदृष्टया विकसित आणि वाढते नागरीकरण यासाठी या शहराचा महाराष्ट्रात वरचा क्रमांक लागतो. लोकसंख्येच्या तुलनेत रोज या शहरात 550 मेट्रीक टन कचरा गोळा होतो. शहरात मोठ्या प्रमाणात गोळा होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी दोन समातंर यंत्रणा कार्य करीत आहेत. यातील एक यंत्रणा शहरातील सर्व प्रकारचा कचरा गोळा करते तर दुसरी यंत्रणा त्या कचऱ्याचे विघटन करून त्यातील पुन:प्रक्रिया करता येण्या- जोगा कचरा वेगळा करणे वगैरे काम करीत असते. यामध्ये घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे, रस्त्यांवरील कचरा गोळा करणे, डम्पिंग साईटवर कचऱ्याची वर्गवारी करणे आणि त्यातून प्लास्टीक सारखा कचरा गोळा करून त्याच्यावर पुन:प्रक्रिया करणे वगैरे गोष्टींचा समावेश आहे.

या गोष्टी व्यवस्थितपणे करण्यासाठी सर्व कचरा वेचकांना प्रशिक्षण दिले आहे. त्यांची कोणत्याही प्रकारची अडवणूक होऊ नये म्हणून त्यांना ओळखपत्रही दिले आहे. त्यांच्या समस्या समजावून घेऊन कचरा वेचण्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. कचरा वेचकांना प्रशिक्षित करून शहराच्या स्वच्छतेचे पर्यायाने त्यांच्याही आरोग्याचे रक्षण करण्याच्या कामी ठाणे महापाय्लकेने महत्वाची भूमिका घेतली आहे. या हातांनीच शहराच्या स्वच्छतेचा मूलमंत्र प्रत्यक्षात राबविण्यास सुरूवात केली आहे.

 
तलावांच्या इतिहासाला नवी झळाळी
 
ठाणे शहर हे तलावांचं शहर आहे. निसर्गाने या शहराला एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 65 तलावांचं वरदान दिलं. पण कालौघात आणि वाढत्या नागरीकरणामुळे यातील अर्धेअधिक तलाव बुजून गेले. पण उर्वरीत 35 तलावांच्या वाट्याला ते दुर्भाग्य येऊ नये म्हणून आम्ही महापालिकेच्या माध्यमातून खाजगीकरणातून तलावांचे संवर्धन आणि सुशोभिकरण प्रकल्प हाती घेतला. यामध्ये केंद्र सरकार, राज्य शासन, नागरिक, स्थानिक स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्थाचा सहभाग निश्चित करून भागीदारीतून विकासाची नवी संकल्पना रुजविली. महत्वाची गोष्ट अशी की, लोकांनीही त्याला साथ देऊन नागरी विकासाच्या प्रक्रियेमध्ये आपला सक्रिय सहभाग नोंदविला.

तलावांचं संवर्धन आणि सुशोभिकरण प्रकल्प हा महापालिकेच्या आणि ठाणे शहराच्या इतिहासातील महत्वपूर्ण टप्पा आहे. तलावांचं शहर असलेल्या या शहराची ही जुनी ओळख परत मिळवून देण्याच्या कामी महापालिकेने हाती घेतलेला शहरातील निवडक 12 तलावांच्या संवर्धन आणि सुशोभिकरणाचा प्रकल्प महापालिकेची राष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करुन द्यायला कारणीभूत ठरला. क्रिसिल ही राष्ट्रीय मानांकन संस्था आणि भारत सरकारच्या नगर विकास मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणाऱ्या क्रिसिल या राष्ट्रीय पुरस्काराने महापालिकेला सन्मानित करण्यात आले. आम्ही एवढ्यावरच न थांबता हळू हळू टप्प्या-टप्प्याने उर्वरित तलावांचे संवर्धन आणि सुशोभिकरण प्राधान्याने करणार असून हे कामही विविध संस्थांच्या सहभागातून आणि भागीदारीतून करण्यात येणार आहे.

या निमित्ताने महापालिकेने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि तलावांचे प्रदूषण रोखण्यासाठी कृत्रिम तलावांची निमिर्ती करून जनतेने त्या तलावात श्री मूर्तींचे विसर्जन करावे यासाठी पुढाकार घेतला. या शिवाय गणेश विसर्जनाची पर्यायी व्यवस्था म्हणून पालिकेने मुंब्रा येथे ही गणेश विसर्जन घाट बांधला. या निमित्ताने आम्ही लोकांना विश्‍वासात घेऊन श्री मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करून पर्यावरणाचा होणारा -हास रोखण्याचा प्रयत्न केला आहे.

 
उद्यानांची हिरवी बेटे
भविष्यात लोकांना मोकळा श्वास घ्यायचा असेल तर शहरातील हिरवाईचं रक्षण करणं ही काळाची गरज आहे. शहरांचे वाढते औद्योगीकरण, वाढते नागरिकीकरण, वाढती लोकसंख्या यामुळे शहरं बकाल आणि भकास होत चालली आहेत. काळाची ही गरज लक्षात घेऊनच ठाणे महापालिका पावले उचलत आहे. या शहराचा पर्यावरणाभिमुख शहर असा विकास करण्यासाठी योग्य ती काळजी घेतली जात आहे.
या शहराच्या विकासाची संकल्पना केवळ पायाभूत विकासाच्या कल्पनेवर आधारित न राहता ती सर्वांगीण असावी याचा विचार करून आम्ही या शहरामध्ये नागरिकांना विरंगुळयाची ठिकाणे म्हणून विस्तीर्ण आणि हिरवाईची झालर पांघरलेली उद्याने निर्माण केली. जुन्या उद्यानांना नवी झळाळी देतानाच नवीन उद्यानांची निर्मिती केली. काही उद्याने अतिक्रमणाच्या विळख्यात सापडली होती ती मुक्त करून त्यांचा विकास केला. हा विकास करताना नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा मिळाव्यात हीच आमची भूमिका होती. शहरात एकूण 65 तलाव असून अलीकडेच ब्रह्माळा तलाव उद्यान, कॉ. गोदुताई परूळेकर उद्यान, निसर्ग उद्यान, सिद्धेश्वर उद्यान निर्माण करून ठाणेकरांना स्वच्छ आणि मोकळा श्वास पुरविणारी हिरवी बेटे उपलब्ध करून दिली आहेत. या शहराचा पर्यावरणाभिमुख विकास करण्याचे ध्येय उराशी बाळगून काम करताना महापालिकेच्या तिजोरीतून पैसा खर्च न करता सुविधा भूखंडाच्या माध्यमातूनही शहरात काही ठिकाणी उद्याने निर्माण करण्यात येणार आहेत. या अंतर्गत तारांगण आणि कोलशेत येथे अशा दोन उद्यानांची निर्मिती करण्यात येणार आहे, जेणेकरून शहरवासीयांना स्वच्छ आणि ताजी हवा देऊ शकू.
 
   
Click to view SHIVSENA website
Our Election Symbol
सामाजिक कार्य
सणोत्सव
सांस्कृतिक
क्रीडा
मुलभूत सुविधा
शैक्षणिक
आरोग्यसंपदा